WHY SHOULD WE INVEST IN GOLD

WHY SHOULD WE INVEST IN GOLD

सोने अक्षयच; आपल्या गुंतवणुकीत हवेच

आदित्य मोडक

सोन्यात गुंतवणूक करावी का? उत्तर होच आहे. सोने आधुनिक भाषेत कमॉडिटी असले तरी सोने सर्वकालीन असून, त्याला महत्त्व काही हजार वर्षांपासून आहे. कारण सोन्याएवढे शाश्वत मूल्य अन्य कोणत्याही गुंतवणूक पर्यायांत नाही. सोने हे चलनाप्रमाणे मूल्यवान आहे. त्यामुळे काळाच्या ओघात गुंतवणुकीचे नवे पर्याय आले असले तरी आधुनिक काळातही जोखीम संरक्षणासाठी सोन्यात गुंतवणुकीस प्राधान्य आहे.

मोठ्या प्रमाणात कधी वाढ?

जगात अस्थिरता निर्माण झाल्यावर गुंतवणुकीचा हमखास पर्याय म्हणून सोन्याकडेच गुंतवणुकदार वळतात याचे अनेक दाखले देता येऊ शकतात. १९७० मध्ये जागतिक पातळीवर मंदीसदृश परिस्थिमुळे सोन्याचे भाव वाढले. १९८० च्या सुरवातीस इराक-इराण यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे सोने वाढून ८५० डॉलरवर गेले होते. त्यानंतर दुसरी मोठी रॅली सोन्यात जागतिक वित्तीय पेच म्हणजे २००८ नंतर आली. त्यामुळे २०११ मध्ये सोने १९०० डॉलरपर्यंत गेले होते. पण, त्यानंतर पुन्हा जागतिक पातळीवर स्थिरता येऊ लागल्यावर सोने करेक्टही झाले.


२०१९ पासून पुन्हा जागतिक पातळीवर भू-राजकीय अस्थिरता, व्यापार युद्ध, मंदी आदींमुळे सोने पुन्हा मागणीत येऊ लागले. विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांनीदेखील संभाव्य स्थिती लक्षात घेऊन २०१९ पासून सोन्यात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आणि आगमी काळातही होत राहील, अशीच शक्यता आहे. तसेच, डॉलरमधील गुंवणूक कमी करून गुंतवणूकदार सोन्याकडे वळले. तसेच, कोव्हिड १९ ला जागतिक महामारी म्हणून घोषित केल्यानंतर जागतिक अर्थव्यवस्था लॉकडाउनमध्ये केली. परिणामी, अर्थव्यवस्थाच थांबली. जोखीम कमी करण्यासाठी चलनाएवढे मूल्य असणाऱ्या सोन्यात गुंतवणूक करण्यास पसंती दिली आहे. त्यामुळेच सोन्यात मार्चनंतर रॅली दिसू लागली आणि ऑगस्टमध्ये सोने प्रति औंस २००० डॉलरच्या पातळीवर गेले. मार्चपासून सोन्याने ३० टक्के परतावा दिला आहे.

अजून वाढणार का?

रशियाने कोव्हिड १९ वर प्रतिबंधात्मक लस शोधल्याचा केलेला दावा आणि एबीएन अॅमरोने कमॉडिटी फायनान्स बंद केल्याने अनेक कमॉडिटी ट्रेडिंग करणाऱ्या गुंतवणूक संस्थांची रोख तरलता कमी झाली. त्याचबरोबर प्रॉफिट बुकिंगसाठी सोने-चांदी बाजारात विक्रीचा दबाव आला. परिणामी सोने प्रति औंस २०७० डॉलरवरून बुधवारी १२ ऑगस्टला सकाळच्या सत्रात प्रति औंस १८७० डॉलरवर म्हणजेच प्रति औंस २०० डॉलरनी खाली आले. २०० डॉलर वाढण्यासाठी सोन्याला १५ दिवसांचा कालावधी लागला होता आणि घटण्यास केवळ ३ दिवस पुरे पडले. सध्याची परिस्थिती पाहता जागतिक पातळीवर अर्थव्यवस्था लवकरच सुधारेल, अशी स्थिती नाही. अमेरिका-चीन व्यापार युद्ध, भू-राजकीय अस्थिरता, व्याजदर या गोष्टी अस्थिर राहणे हे सोन्यावर परिणाम करणारे घटक आहेत. अल्पकाळासाठी सोने-चांदीतील कमकूवतपणा सोने-चांदीतील दीर्घकालीन सकारात्मक ताकदीला कोणत्याहीप्रकारे बदलू शकणार नाही.

दीर्घकालीन फायदा

सामान्य गुंतवणूकदार म्हणून गुंतवणूक करताना अल्पकालीन तेजी-मंदीला भुलता कामा नये. सोने व चांदीत गुंतवणूक करताना तीन ते पाच वर्षे गुंतवणूक करण्याचे उद्दिष्ट ठेवावे. यामुळे यात होणाऱ्या गुंतवणुकीचा सरासरी भाव मिळतो आणि त्याचे लाभही तसेच असतात. मोठा दीर्घकालीन विचार केल्याने सोन्याचे १४ टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. गेल्या पाच वर्षांचा विचार केल्यास सरासरी तीस हजार रुपयांवर असणारे सोने पन्नास हजार रुपयांच्या पुढे आहे. यावरूनच लक्षात येईल की सोन्यात दीर्घकालीन गुंतवणूक फायद्याची आहे. सामान्य गुंतवणूकदारांनी टप्प्याटप्प्याने व भावात तीव्र चढ-उतार नसताना सोने-चांदीत गुंतवणूक करावी. यामुळे सरासरी भाव मिळून फायदा वाढण्याची शक्यता वाढते. सोन्यात असणारी चलनक्षमता, रोकड सुलभता यांच्यामुळे आपल्या गुंतवणुकीच्या पोर्टफोलियोत सोने हे असावेच. कारण, अडचणीत किंवा गुंतवणुकीत चांगला परतावा देणारे ते अक्षय माध्यम आहे. कमॉडिटीत गुंतवणूक करताना भाव खाली आल्यावर त्यात दीर्घकालीन गुंतवणुकीचा हेतू ठेवावा.

सोने गुंतवणूक पर्याय सोन्यात आपण दोन पद्धतीने गुंतवणूक करू शकतो. पहिला पर्याय पारंपरिक म्हणजे सराफाकडून सोने खरेदी. पण, फिजिकल सोने घेताना आणि विकताना त्यावर ट्रॅजॅक्शन कॉस्टचा खर्च लक्षात ठेवावा. याला पर्याय म्हणून सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी गोल्ड ईटीएफ हा पर्याय विचारात घेता येऊ शकतो. कारण, यात खरेदी-विक्री ही बाजारातील भावानुसारच असते. यासाठी फक्त आपल्याला डी-मॅट खाते असणे आवश्यक आहे. याच्या माध्यमातून दर महिन्याल किंवा आपल्याला हवे तेव्हा (बाजार सुरू असताना) खरेदी करता येते. वेगवेगळ्या म्युच्युअल फंड कंपन्यांचे गोल्ड इटीएफ बाजारात उपलब्ध आहेत. भारतीयांची मानसिकता ही सोन्यात दीर्घकालीन गुंतवणुकीचीच आहे. कारण सोन्याच्या दागिन्यांशी भारतीयांचे भावनीक नाते आहे. तसेच, करणावळ वाया जाईल या मानसिकतेमुळे सोन्याच्या दागिन्यांतील गुंतवणूक ही आपसूकच दीर्घकाळासाठी राहते आणि यामुळे सोन्यातील गुंतवणुकीवर होणारा दीर्घकालीन फायदा गुंतवणूकदारास अनुभवायला मिळतो. (लेखक सीए असून पीएनजी सन्स चे सीएफओ आहेत.)